आज आहे जागतिक पुस्तक दिवस !

कोण म्हणतं हल्लीची मुलं वाचत नाहीत ? अहो वाचतात की, फेसबुकवर, Whatsapp वर आणि बाकीच्या सोशल मिडियावर. अर्थात हे खूपच वाईट आहे असं काही नाही. पण सध्या आपल्या आसपास जे कोणी आहेत ते बहुतेक ‘असेच’ आहेत.

आजच्या पिढीला किती मराठी लेखक माहिती आहेत ? किमान ते माहित असावेत, वाचावेत याचं भान किती जणांना आहे ? खरंच खूप मोठा प्रश्न आहे.

बहुतेकजण म्हणतात या सोशल मिडियाने सगळ्यांचं वाटोळं केलंय. कदाचित तुम्हाला वाटू शकेलच. पण पूर्ण असं नाहीये ओ ! आज या सोशल मिडियावर सुद्धा कित्येक चांगले लिखाण वाचायला मिळते. शेअर करता येते. रोज कोण काय लिहितंय, कोण काय वाचतंय हे कळत जातं, त्यावरून आपल्याला सुद्धा लक्षात येतं की आपण किती वाचलंय !

ज्या गोष्टीचा जेवढा फायदा असतो तसाच तिचा तोटासुद्दः असतोच. साधं पाण्याचं उदाहरण जर बघितलं तर पाणी पिणं हे प्रत्येकाला गरजेचं आहेच, पण समजा हेच पाणी खूपच प्यायलं किंवा दुषित प्यायलं तर काय होईल ? तसंच आहे वाचनाचं.

पुस्तकं कोणती वाचावीत हे सुद्धा सांगणारं कोणीतरी आसपास हवं असतं. जर तसं कोणी नसेल तर किमान वाचत राहिलं पाहिजे. एक काळ येतोच आपल्याला आवडतं ते आपण स्वीकारत जातो आणि त्या दिशेने पुढे वाटचाल करतो.

आज किती जणांना नवीन लेखक माहिती आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. मराठीमध्ये नवीन लेखक खूप छान आणि वेगळं लिखाण करत आहेत. त्यात प्रणव सखदेव (निळ्या दाताची दंतकथा, नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य) आहे, अवधूत डोंगरे(स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट) हे आणि असे कित्येकजण आहेत, फेसबुकवर लिहिणारे सुद्धा खूप आहेत. याच सोशल मिडियाचा वापर करूनसुद्धा लिहिणारे-वाचणारे खूप जण आहेत.

एक स्टेप पुढे !

तन्वीर सिद्दिकी नामक एक मनुष्य आहे याची फेसबुक प्रोफाईल तुम्ही बघू शकता. सातत्याने हा काही न काही लिहित असतो. याचं ‘अलाहिदा’ नावाचं पुस्तक प्रकाशित आहे. यानीच आता त्याचं App तयार केलं आहे ज्याद्वारे तो आता त्याच्या वाचकांशी जोडलेला राहील. त्यात त्याचं लिखाण वाचायला मिळेल ! गुगल प्ले स्टोअर वर तुम्हाला याचं हे App मिळेल.

दोन चार ओळीत झोप येती ओ आम्हाला !

कित्येकजण वाचनाचा कंटाळा करणारे फार असतात. दोन चार ओळी वाचल्या की आला कंटाळा. पण एकदा का वाचनाची गोडी लागली तर त्यासारखा दुसरा कोण मित्र नसतो ! हा मित्र ना तुम्हाला दगा देईल ना तुम्हाला त्रास देईल. जे काही देईल ते अर्थात रोज नवीन काहीतरी ! आता अजून काही सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष काही करून बघता येईल बघा, सगळ्यात सोप्पं म्हणजे, घरी आलेल्या वर्तमानपत्रातला निदान एक लेख वाचा, काहीतरी फरक जाणवेलच ! वाचनाची गोडी लागली की मग पुस्तकं आपल्याकडे अगणित अशी आहेत. कोणी ती संग्रही ठेवतं, कोणी लायब्ररी लावतं, कोणी किंडलवर वाचतं. वाचू द्या कुठेही पण वाचणं महत्वाचं ! त्याने माणूस ‘माणूस’ म्हणून घडतो !

  • योगेश विद्यासागर.
Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment