फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हाटसअ‍ॅपचं मोठं पाउल !

फेक न्यूजचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्यामुळे होणारे प्रकार आपल्यासमोर आलेले आहेत. पण पुढे काय ? हे असंच चालू राहणार का ? तर अर्थात नाही. यावर उपाय हा करावाच लागणार आणि त्याच दृष्टीने फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हाटसअ‍ॅपने एक मोठं पाउल उचललं आहे.

फेक न्यूजबाबत अचूकपणे शहानिशा करण्यासाठी व्हाटसअ‍ॅपने आता एक परिणामकारक टुल सादर केले असून यातून युजरला संशयास्पद लिंकबाबत खरी परिस्थिती समजणार आहे.

सोशल मीडियातील व त्यातही व्हाटसअ‍ॅपसारख्या मॅसेंजरवरील फेक न्यूज या अतिशय चिंतेचा विषय बनल्या आहेत. देशभरात अफवांवरून गेलेल्या बळींच्या मागे हाच प्रकार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. यामुळे फेक कंटेटला ओळखणे वा त्याच्या शेअरींगला आळा घालणे याला आज सरकार प्राथमिकता देत आहे. यासाठी केंद्र सरकारने फेसबुक, व्हाटसअ‍ॅप, ट्विटर, युट्युब आदी कंपन्यांकडे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता व्हाटसअ‍ॅपवर फेक न्यूजला आळा घालण्यासाठी एक अतिशय परिणामकारक टुल येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या मॅसेंजरच्या २.१८.२०४ या प्रयोगात्मक म्हणजेच बीटा आवृत्तीचे अपडेट सादर केले आहे. यात आगामी फिचर्सची चुणूक दिसून आली आहे. यातील एक सर्वात भन्नाट फिचरची माहिती व्हाटसअ‍ॅपबाबत अतिशय तंतोतंत माहिती देणार्‍या wabetainfo या संकेतस्थळाने जाहीर केली आहे. यानुसार फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हाटसअ‍ॅप लवकरच सस्पीशस लिंक डिटेक्शन ( Suspicious Link Detection ) या नावाने नवीन फिचर देण्यासाठी सज्ज आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे टुल वापरून कुणीही आपल्याकडे वैयक्तीक चॅट अथवा ग्रुपच्या माध्यमातून आलेल्या लिंकवरील मजकूर खरा आहे की फेक? याची खातरजमा करू शकणार आहे. ही प्रणाली नेमकी कशी काम करणार याची माहितीदेखील wabetainfo या संकेतस्थळाने दिली आहे. यानुसार एखादी लिंक समोर आल्यानंतर युजरने यावर क्लिक करण्याआधी त्यात नेमके काय आहे याचा रिअ‍ॅलिटी चेक होणार आहे. अर्थात संबधीत लींक हे फेक न्यूजयुक्त आहे.यात मालवेअर्स आहेत वा यात स्पॅमींगयुक्त मटेरियल आहे ? की यावर क्लिक केल्यावर भलतीकडेच रिडायरेक्ट होतेय ? या बाबींना व्हाटसअ‍ॅपतर्फे एका इनबिल्ट प्रणालीच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहे. यानंतर संबंधीत लिंकमध्ये संशयास्पद बाब आढळून आल्यास संबंधीत लिंकवर लाल रंगात धोक्याचा इशारा देण्यात येणार आहे. या इशार्‍याकडे दुर्लक्ष करूनही कुणी याला उघडण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा एकदा अलर्ट देण्यात येणार आहे. अर्थात याकडेही दुर्लक्ष करून लिंक उघडलीच तर पुढील अनर्थासाठी तो युजरच जबाबदार राहणार आहे. दरम्यान, एखादी लिंक ही उघडण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्यास लाल रंगातील अलर्ट येणार नाही. यामुळे शेअर करण्यात येणार्‍या लिंकच्या सुरक्षेबाबतचे बहुतांश प्रश्‍न सुटू शकतील असे मानले जात आहे. सध्या हे फिचर काही डेव्हलपर्सच्या माध्यमातून चाचणीच्या स्वरूपात वापरण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये याला बीटा आवृत्तीत प्रदान करण्यात येणार असून नंतर सर्व युजर्सला हे फिचर अपडेटच्या स्वरूपात मिळणार आहे.

कृपया लक्षात घ्या : व्हाटसअ‍ॅपवरील सर्व संदेश हे एंड-टू-एंड एनक्रिप्शनच्या माध्यमातून सुरक्षित आहेत. यामुळे याला कुणीही त्रयस्थ व्यक्ती, संस्था, कंपनी अथवा शासकीय/निमशासकीय विभाग पाहू शकत नाही. सध्या आपण पाठवलेले संदेश हे पोलीसांसह सरकार पाहणार असल्याचा मॅसेज मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा मॅसेज आणि यासोबत असणारे ग्राफीक्स हे तद्दन खोटे आहे. यामुळे अफवांना बळी पडू नका आणि अफवांना खतपाणीदेखील घालू नका ही विनंती. ( TechWarta वरून साभार ).

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment