तुम्ही पाठवलेला ईमेल तिऱ्हाईत व्यक्ती वाचू शकते ?

टेक्नॉलॉजीच्या या जगात कधी कुठे काय होईल याचा आता थांगपत्ता लागणं खूप मुश्कील झालं आहे. ही टेक्नॉलॉजी जेवढी चांगली आहे तेवढीच किंबहुना त्याहून जास्त धोकादायक ठरती आहे असं आता समोर यायला लागलं आहे. फेसबुक डेटा लीक प्रकरण तर आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धडाच ठरला आहे.

कित्येक कंपन्यांचे कामं किंवा ऑफिशियल जे काही कामं असतात ते आपण शक्यतो ईमेलवर ठेवत असतो. काही महत्वाचे कागदपत्र पाठवायचे असतील किंवा आणखी काही महत्वाचे पत्र लिहायचे असेल तर ईमेलचा वापर केला जातो.

त्यातल्या त्यात आपण बहुतेकजण वापरतो तो ईमेल म्हणजे जीमेल ! हा जीमेल म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ईमेल पाठवण्यासाठी अनेकांचा हा सर्वांत आवडीचा आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म मानला जातो. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की तुमचा ईमेल हा सुरक्षित नाही आहे किंवा तुम्ही धाडलेला ईमेल तिऱ्हाईत व्यक्ती वाचू शकते? विश्वास नाही बसणार पण हे सत्य आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार…

गुगलने स्वतः हे मान्य केलं

गुगलने स्वतः हे मान्य केलं आहे की जीमेल युजर्सना आलेले आणि त्यांनी पाठवलेले मेल मशिनच नाही तर काही वेळा थर्ड पार्टी अॅप डेव्हलपरही वाचू शकतात. ज्या युजर्सनी आपलं जीमेलचं अकाउंट थर्ड पार्टी अॅपला कनेक्ट केलं असेल तर त्यांनी अजाणतेपणाने त्या अॅपच्या स्टाफला ईमेल वाचण्याची परवानगी दिलेली असू शकते.

एका कंपनीने वॉलस्ट्रीट जर्नलला सांगितलं की, ही पद्धत अगदी सर्वसामान्य आहे आणि हे एक ‘डर्टी सिक्रेट’ आहे. गुगलने ही पद्धत त्यांच्या धोरणांच्या विरोधात नाही, असं सूचित केलं आहे. तर एका तज्ज्ञाने गुगल अशा प्रकारे परवानगी देऊ शकतं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

थर्ड पार्टी ईमेल मॅनेजमेंट

जीमेल ही जगातील सर्वांत प्रसिद्ध अशी ई मेल सेवा असून तिचे 1.4 अब्ज युजर्स आहेत. गुगलचे युजर्स जीमेल थर्ड पार्टी ईमेल मॅनेजमेंट किंवा इतर अॅप आणि सेवांना कनेक्ट करू शकतात.

अशा पद्धतीने गुगलबाहेरील सेवांना जेव्हा आपण जीमेलशी कनेक्ट करतो त्यावेळी आपण काही परवानग्या (Permission) देत असतो. त्यामध्ये बऱ्याच वेळा ईमेल वाचणे, सेंड करणे, डिलिट करणे, आणि ईमेल मॅनेज करणे, अशा प्रकारच्या परवानग्याही आपण देत असतो.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, काही वेळा थर्ड पार्टी अॅपच्या कर्मचाऱ्यांना ईमेल वाचण्याची परवानगी देतो. सर्वसाधारणपणे अशा प्रक्रिया काँप्युटरच्या अल्गोरिदमने होत असतात. पण या वृत्तपत्राने बऱ्याच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी हजारो ईमेल वाचलेले आहेत.

एडिसन सॉफ्टवेअरने या वृत्तपत्राला सांगितलं की त्यांनी नवीन सॉफ्टवेअर वाचण्यासाठी हजारो ईमेल वाचले आहेत. ई डेटासोर्स या कंपनीने सांगितले की त्यांच्या इंजिनीअर्सनी अल्गोरिदममध्ये सुधारणा करण्यासाठी पूर्वी इमेलचं परीक्षण केलं होतं.

असे मेसेज वाचण्यासाठी युजर्सकडून कोणतीही विशेष परवानगी घेण्यात आली नव्हती, कारण त्यांच्या युजर अॅग्रीमेंटमध्येच याचा समावेश आहे, असं या कंपन्यांनी सांगितलं. युनिव्हर्सिटी ऑफ सुरीचे प्रा. अॅलन वुडवर्ड म्हणाले की, युजर अॅग्रीमेंटमधील नियम आणि अटी वाचण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.

जरी अॅग्रीमेंटमध्ये लिहिलं असलं तरी कुणालाही थर्ड पार्टी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तुमचे ईमेल वाचावेत हे कुणालाही आवडणार नाही, असं ते म्हणाले. गुगलने म्हटलं आहे की, काळजीपूर्वक परीक्षण केलेल्या कंपन्या तेही युजर्सने परवानगी दिली असेल तरच मेसेज अॅक्सेस करू शकतात.

गुगलच्या डेव्हलपर पॉलिसीनुसार डेव्हलपरच्या अॅप्लिकेशनच्या सेवा, फिचर्स आणि कृती जर ‘मार्केटेड’ कारणांपेक्षा इतर कारणांसाठी वापरली गेली तर गुगल API सेवांचा अॅक्सेस गुगल काढून घेऊ शकतो. सेक्युरिटी चेकअप पेजवर जीमेल युजर्स कोणकोणत्या अॅप्सना अकाउंटला लिंक केले आहेत हे पाहू शकतात, असं गुगलने म्हटलं आहे.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment