संत समाधीचे मंदिर – भाग ६

लेखिका – डॉ. कल्याणी नामजोशी

( डॉ. कल्याणी नामजोशी यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेविषयी लिहिलेल्या विस्तृत लेखमालेचा भाग पाच आपण दिनांक २४ जून २०१८ रोजी वाचला. आज सादर करत आहोत भाग ६ ).

जगातल्या कोणत्याही धार्मिक संप्रदायाची उभारणी तत्वज्ञान आणि त्याला योग्य असा आचार यावर झालेली असते. तत्वज्ञान म्हणजे परमेश्वर, जीव आणि जगत याविषयीचे ज्ञान. आचार म्हणजे व्यवहार, जीवन जगण्याची पद्धती होय. मग वारकरी आपलं जीवन कोणत्या तत्वज्ञानाच्या मापानं बेततो ! वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे सार म्हणजे अद्वैताची अनुभूती आणि निष्काम भक्ती होय. भक्ति सहज आणि अकृत्रिम आहे. याचा अर्थ ती परमेश्वराच्या स्वरूपातच सहजभावानं आहे. आईचं मुलावरचं प्रेम जितकं स्वाभाविक आहे तितकंच परमात्माचं विश्वावरचं प्रेम सहज स्वाभाविक आहे. म्हणून भक्त ही विश्वावर व परमेश्वरावर तितक्याच सहज भावानी प्रेम करतो. अद्वैताची अनुभूती सगुण परमात्म्याच्या भजनातून प्राप्त होते. जीव आणि परमात्मा यामधली अभिन्नता, समरसता, एकरूपता प्रत्ययाला येणे म्हणजे अद्वैतानुभूती होय.

साऱ्या जगात तोच भरून राहिला आहे. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म I’ याची भक्ताला सतत जाणीव आहे. विठ्ठलाच्या सगुण रूपाच्या भक्तीतच निर्गुणाचा अनुभव येतो. भगवंताला काहीही न मागणे, त्याच्याकडून कशाचीच अपेक्षा न करणे म्हणजेच शुद्ध निष्काम भक्ती होय. अद्वैताचा अनुभव म्हणजे जीव, जगत आणि जगदीश्वर यात भेद शिल्लक न राहणे, सर्व म्हणजे केवळ एक परमात्माच आहे, याचा प्रतिक्षणाला अनुभव घेणे हा वारकऱ्याचा श्रेष्ठ आचार होय. यातूनच त्याला सर्व विश्वब्रह्मांड विठ्ठलाच्या प्रेमानं भरून राहिलं आहे असे जाणवते. म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

तुज सगुण म्हणू की निर्गुण रे I

सगुण निर्गुण एक गोविंदू रे II

भक्तीत जर भक्ताला सगळंच एक वाटायला लागलं तर व्यवहार कसा व्हायचा ? माउली म्हणते, सच्च्या भक्ताची अद्वैत भावानंच भक्ती होते, आणि भक्तीतच व्यवहारही होतो. जसा एकाच डोंगरात ‘कैलासांसारख्या लेण्यांमध्ये देव, देऊळ आणि परिवार कोरला जाऊ शकतो, तसाच एकाच अद्वैत अनुभवात देव, भक्त आणि भक्ती यांचा व्यवहार होतो. तर तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्ती सर्वांचा मुकुटमणी आहे, मोक्षासकट इतर सर्व मुक्काम अलीकडेच राहतात. भक्त तर प्रेमानंद लुटतोच. पण माउली म्हणतात, ‘सेवितो हा रस वाटितो आणिका’ त्याप्रमाणे तो भक्तीरस साऱ्यांना मुक्तहस्ताने वाटतो.

संतांची धारणा थोडक्यात अशी सांगता येते. जग हे क्रीडांगण आहे. जीव हा परमात्म्याचा खेळगडी आहे. जीव अल्पज्ञानी आणि अल्पशक्ती आहे. तरीही विठ्ठलाच्या भक्तीसुखाच्या क्रीडेचा अधिकारी आहे. वारी, भजन, कीर्तन, नामस्मरणात केलेले दैनंदिन व्यवहार म्हणजे भगवंताशी अत्यंत लाडिवाळपणाने केलेली क्रीडाच आहे. म्हणूनच प्राप्त कर्माचा त्याग न करता विहितकर्माचरणाने भगवंताची भक्ती निष्काम भावाने करणे हीच जीवनाची इति कर्तव्यता आहे. असा वेदांचा जो प्रमुख सिद्धांत आहे तो वारकऱ्यांनी नेटाने आचरणात आणावा आणि जीविताचे कल्याण करून घ्यावे, हाच परमात्माचा सोपा सुलभ मार्ग ठरतो.

लेखिका –  डॉ. कल्याणी नामजोशी

(लेखिका या संतवाड्मयाच्या अभ्यासक असून त्यांनी अध्यात्मिक विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची या विषयावरील व्याख्यानेही अत्यंत लोकप्रिय आहेत).

संत समाधीचे मंदिर – भाग ५

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment