निर्भया प्रकरणी दोषींची फाशी कायम !

सगळ्या देशाला ज्या घटनेने हादरवून सोडलं ती घटना म्हणजे दिल्लीतली घटना. दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 रोजी घडलेल्या आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या “निर्भया’ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील 4 पैकी 3 दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. आर. बानुमथी आणि न्या. अशोक भूषण यांच्या पिठाने मुकेश (वय 29 वर्षे), पवन गुप्ता (वय 22 वर्षे) आणि विनय शर्मा (वय 23 वर्षे) यांची ही फेरविचार याचिका फेटाळली. फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्यासाठी या तिघांकडून कोणतेही कारण देण्यात आलेले नसल्याने त्यांना सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने या दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयातील आव्हान याचिकेवरील सुनावणीदरम्यान या तिन्ही दोषींची बाजू सविस्तर मांडण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निकालामधील कोणतीही त्रुटी दाखवण्यास या तिघा दोषींना अपयश आले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणातील चौथा दोषी अक्षय कुमार सिंह (वय 31 वर्षे) याने फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याची याचिका केलेली नव्हती. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने या चौघांनाही बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2017 रोजी कायम ठेवली होती.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. तर आणखी एक आरोपी अल्पवयीन होता. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आले होते. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

 १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये फिजिओथेरपीचे शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय निर्भयावर चालत्या बसमध्ये सहाजणांनी बलात्कार करून तिला मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले. आरोपींमध्ये एक १७ वर्षांचा अल्पवयीनही होता.
 २९ डिसेंबर २०१२ ला निर्भयाचा सिंगापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 या भयंकर घटनेचे पडसाद दिल्लीसह देशभर उमटले. तत्कालीन यूपीए सरकारने महिला अत्याचाराविरुद्ध कायदा कडक केला.
 मुख्य आरोपी राम सिंहने तिहार कारागृहात आत्महत्या केली.
 विशेष न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा १३ मार्च २०१४ ला दिल्ली उच्च न्यायालयाने कायम ठेवली. 
५ मे २०१७ ला सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment