फिफा : उपांत्य फेरीचा पहिला सामना फ्रान्स VS बेल्जियम

फिफा विश्वचषक

फिफा विश्वचषक अंतिम टप्प्यात

फिफा विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज फिफा विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना 10 जुलैला फ्रान्स विरूद्ध बेल्जियम असा होणार आहे. सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रौ 11.30ला सुरूवात होणार आहे. ह्या दोन संघाचा हा एकमेंकाविरूद्ध खेळला जाणारा 74वा सामना असणार आहे. यामध्ये बेल्जियम 30 तर फ्रान्स 24 सामने जिंकले असून 19 सामने अनिर्णित राहिले.

याआधी फिफा विश्वचषकात हे दोन संघ दोनदा आमने-सामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात फ्रान्सनेच बाजी मारली आहे. फ्रान्सने 1938च्या साखळी फेरीत 3-1 असा आणि 1986च्या विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी खेळलेल्या सामन्यात 4-2 असा बेल्जियमचा पराभव केला आहे.

2015ला फ्रान्स विरूद्ध बेल्जियम असा मैत्रीपूर्ण सामना पॅरीसमध्ये झाला होता. या सामन्यात बेल्जियमने फ्रान्सला 4-3 असे पराभूत केले होते. बेल्जियमची उपांत्य फेरीत खेळण्याची ही दुसरीच वेळ आहे. 1986ला ते पहिल्यांदा उपांत्य सामना खेळले होते. यामध्ये त्यांना अर्जेंटीनाकडून 2-0 असा पराभवाचा सामना करावा लागला.

बेल्जियम संघाने या स्पर्धेत सर्वाधिक असे 14 गोल केले आहेत. 2002च्या विश्वचषकात ब्राझिलने 18 गोल करत असा पराक्रम केला होता. मिडफिल्डर इडन हझार्ड आणि रोमेलू लुकाकू हे बेल्जियमचे खेळाडू फ्रान्ससाठी धोकादायक ठरू शकतात. त्या दोघांनी मिळून या स्पर्धेतील 4 सामन्यात 6 गोल केले आहेत.

फिफा विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व सामन्यात बेल्जियमने पाच वेळेचा फिफा विश्वचषक विजेता बलाढ्य ब्राझिलचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. तर फ्रान्सने पहिल्या उपांत्य पूर्व सामन्यात उरुग्वेवर 2-0 एकहाती वर्चस्व राखले.

2006 नंतर फ्रान्स प्रथमच उपांत्य फेरीत

पहिल्या हाफमध्ये 41 व्या मिनिटाला फ्रि किकवर अॅटोनियो ग्रीझमनने दिलेल्या पासवर हेडद्वारे गोल करत राफेल वॅरनने फ्रान्सला खाते उघडून दिले. केविन डि ब्रूनने 31 व्या मिनिटाला विजयी गोल केला.

सामन्याच्या सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या फ्रान्सने उरुग्वेला सामन्यात गोल करण्याची एकही संधी दिली नाही. या विजयाबरोबरच फ्रान्सने 2006 च्या विश्वचषकानंतर प्रथमच उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

30 जूनला झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात फ्रान्सने बलाढ्य अर्जेंटीनाला 4-3 अशी सहज मात दिली. या सामन्यातील 2 गोल एकट्या कायलिन एमबाप्पेने केले होते ते ही 4 मिनीटांच्या फरकाने. फ्रान्सने या स्पर्धेत अर्जेंटीना आणि उरुग्वे तर बेल्जियमने ब्राझिल अशा तगड्या संघांना पराभूत केले आहेत. फिफा क्रमवारीत बेल्जियम 3ऱ्या तर फ्रान्स 7व्या क्रमांकावर आहे.

संघ –

फ्रान्स- ह्यूगो ललोरीस, बेंजामिन पॅवार्ड, सॅम्युअल उमटिती, राफेल वराने, लुकास हर्नांडेझ, एनगोलो कॅंटे, पॉल पोग्बा, कोरेंटिन टॉलिसो, कायलिन एमबाप्पे, एंटोनी ग्रिजमान, ऑलिव्हर गिरहोद

बेल्जियम- थिबाउट कोर्टॉइस, जॅन व्हर्टॉन्गें, व्हिन्सेंट कॉम्पानी, टोबी अॅल्डरवीरल्ड,
एक्सेल विस्सेल, केविन डी ब्रुने, चाडली नासरे, थॉमस मेयुएर, मारुउने फेलेनी, इडन हॅझर्ड, रोमेलू लुकाकू

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment