पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबरच त्यांची मुलगी मरियमला सात वर्षाच्या तसेच मुलाला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लंडन मधील बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात कोर्टाने नवाज शरीफ यांना ८० लाख पाऊंडचा दंड आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला २ लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इस्लामाबादच्या भ्रष्टाचार विरोधी कोर्टाचे न्यायाधीश महमूद बशीर यांच्या न्यायालयात साडेनऊ महिने या भ्रष्टाचाराच्या खटल्याची सुनावणी सुरू होती. नवाझ शरीफ यांच्या या खटल्याची सुनावणी 3 जुलैला पूर्ण झाली होती आणि कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. या खटल्यात नवाझ यांच्यासह मुलगी मरियम नवाझ, हसन नवाझ, हसीन नवाझ आणि कॅप्टन शफदर यांच्याविरोधात आरोप होते.

निर्णय एक आठवडा उशीरा द्यावा अशी याचिका

दरम्यान , न्यायालयाने या संदर्भातला निर्णय एक आठवडा उशीरा द्यावा अशी याचिका नवाज शरीफ यांनी कोर्टात दाखल केली होती . मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे . लंडनमध्ये नवाज शरीफ यांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केली. याच प्रकरणात आता त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे.एवनफिल्ड हाऊस मध्ये ४ घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे. पाकिस्तानच्या अकाऊंटिबिलिटी कोर्टाने नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे.

नवाज शरीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराची चार प्रकरणे सुरु आहेत. पनामा पेपर प्रखरणी मागील वर्षी पाकिस्तानच्या उच्च न्यायालायाने निर्णय दिल्यावर नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोने कोर्टात याचिका दाखल केली होती. पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले. आता त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आल्याने त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या अडचणीत भर पडली आहे.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment