तिकडं गेलं तरच करिअर आहे…

शहराकडे चला, असं नुकतंच शिक्षण संपून नोकरीच्या दारात असणाऱ्या बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात हा विचार असतोच असतो. काय आहे शहरात ? असं कोणी विचारलं तर त्याला उत्तर येतं, अहो काय नाहीये शहरात ! अमुक आहे तमुक आहे. सगळ्या सोयीसुविधांनी सज्ज असं आयुष्य आहे इथं ! असे काय काय उत्तरं मिळत जातात.

पुण्या मुंबईसारख्या शहरात आल्यावर तसं आहेसुद्धा ! त्यात वाद नाहीच. पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही जिथं राहता तिथलं आयुष्य अगदीच कवडीमोलाचं आहे किंवा त्याला काही काडीची किंमत नाहीये. असं अजिबात नाहीये. ते तिकडचं आयुष्य तुम्हाला स्पष्टच होत नाही, कारण तुम्ही त्यादृष्टीने विचारच केलेला नसतो, त्या जागेवर जाऊन विचारच केला नसतो.

आजवर तुम्ही तिथं राहताय याचा सरळ अर्थ आहे की अर्थातच तुम्ही तिथे राहू शकता, थोडक्यात काय तर कमवू शकता. फरक काय असेल तर तो म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्यात, परिस्थितीत आणि कामाच्या स्वरूपात फरक असेल. हल्ली फारच यावर बोललं जातं कारण शहरं प्रचंड झपाट्याने बदलत आहेत आणि त्या तुलनेत बाकीची शहरं आधीच्याच गतीला आहेत. तुमचं शहर ४० च्या स्पीडने चालत असेल तर पुण्या-मुंबईसारखे शहरं हे १२० च्या स्पीडने धावतात, अक्षरशः धावतात.

या ४० वरून डायरेक्ट १२० ला रुटीन जमवायचं म्हणजे एकेकाच्या नाकी नऊ येतातच येतात. पुन्हा त्यात मग इथली स्पर्धा आली. तू पुढे की मी पुढे असं पावलापावलावर तुम्हाला अनुभवायला मिळतं. अर्थात स्पर्धा चांगलीच, पण यात तुमचं आयुष्य कुठं चाललंय हेच तुम्हाला कळत नाही. तुम्ही जे काही शोधायला, जे काही कमवायला इकडे येता ते मिळतंय का असा खूपच साधा प्रश्न मग पडायला लागतो. म्हणजे जिथं हा प्रश्न पडतो तिथं मग तुमचं पर्सनल लाईफ, घरच्यांना वेळ देणं, गुंतवणूक, मनोरंजन हे सगळं कुठच्या कुठे निघून जातं.

पैश्याच्या बाबतीत म्हणायचं तर मिळतो, चिक्कार पैसा इकडे शहरात मिळतो. पण त्या मागे काय काय कष्ट घ्यावे लागतात हे इकडं आल्यावरच कळतं. साध्या जेवणापासून सुरुवात जर केली तर मुळात तुम्ही बाहेरचे असता म्हटल्यावर मेस आली, ते काही घरचं जेवण मिळत नसतं आणि इथं सुरुवात होते तुमच्या आयुष्यावर परिणाम व्हायला. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यात निम्मा पैसा खर्च होतो. नंतर येतो प्रवास आणि प्रवास म्हटलं की त्यासोबत रस्त्यावरची गर्दी ती कोणाला चुकली आहे ? मग तिचा होणारा मानसिक त्रास. मग तो प्रवास खर्च. तुमचं राहायचं ठिकाण आणि कामाचं ठिकाण हे शक्यतो जवळ नसतात. त्यामुळे मग या प्रवासाचा खर्च वाढतो. तुमच्या शहरात कधी जाणार असाल तर तिकडं जायचा खर्च, जाताना होणारा त्रास हे सगळंच तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर नक्कीच परिणाम करत जातं.

आता म्हणाल एवढाच जर त्रास आहे तर मग शहरात सगळेच का थांबतायत मग ? मुळात आज ९० टक्के लोक हे पैश्याच्या मागे आहेत. त्यामुळे इथे मिळणारा पैसा, सुखसोयी या सगळ्यांना हव्याहव्याश्या वाटतात. इकडं येऊनच सगळं काही नीट आयुष्य जगायला मिळतं हा एक मोठा गैरसमज कित्येकांचा आहे. पण यामागे प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर होणारा त्रास त्याचं काय ? त्याचा अर्थात विचार येतो पण ते ‘दुसऱ्या दिवशी ऑफिस आहे’ या विचारामुळे थोपवलंच जातं. ते तडीस नेलं जात नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे इथं एवढा मोठा पगार आहे, तो सोडून कमी पैश्यात दुसरीकडं काम करायला खूप क्वचित लोक तयार होतात. लोक काय म्हणतील ? हा एक मोठा गहन मुद्दा.

आणखी एक गोष्ट म्हणजे तुमचा रिझ्युम. समजा तुम्ही कुठे निर्णय घेतला तर त्या रिझ्युममध्ये खंड पडलेला दिसेल, पुढे जाऊन तुम्ही कुठे मुलाखतीला गेलात तर अर्थात विचारतील की, मध्यंतरी तुम्ही काय करत होता ? तर हा त्यांच्या दृष्टीने विचारलेला योग्य प्रश्न आहे. हा त्या क्षेत्रात येणाऱ्यासाठी हा प्रश्न येणारच आहे. ठरवायचं आहे ते तुम्ही, त्याच क्षेत्रात राहायचं असेल, पुन्हा इकडेच येणार असाल तर मग दुसरं काही धाडस करण्यात अर्थ नाही. पण जर खरंच वेगळं काही करायचं असेल तर मग मात्र रिझ्युम ही फक्त एक कागद आहे, जो तुमचा त्या त्या क्षेत्रातला अनुभव दाखवतो.

शहरांचं म्हणाल तर शहरात अर्थात संधी आहेत, चिक्कार पैसा आहे पण त्याचसोबत येणारा शारीरिक आणि मानसिक त्रास आहे ! हे सगळ्यांना नीट लक्षात यायला बराच काळ लोटतो. पण या सगळ्याच्या तुलनेत तुम्ही आहे त्या शहरात काही करू शकता, तिथे तुम्ही कमवू शकता हे विचार कधी केलेत ? मुळात तुमची प्रायोरिटी काय यावर सगळं अवलंबून आहे. किती काही केलं तरी आज सगळ्या गोष्टी पैश्यावर येऊन थांबतात. तुमचं जेवणखाणं असो किंवा तुमचं लग्न असो. त्यामुळे तुमच्या कमावण्यासाठीच तर विचार करायचा आहे. मग चार पैसे कमी मिळाले आणि तुम्ही आहे तिथं सुखात राहिलात तर काय बिघडतंय ? तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी राहाल, घरच्यांसोबत असाल, त्यांना वेळ देता येईल, घरचं जेवण असेल, प्रवासाचा एवढा त्रास नसेल, जीवाला शांतता असेल, थोडक्यात तुम्ही समाधानी असाल. चिक्कार पैसा त्यासाठी येणारा १२० चा स्पीड की मग मनभरून समाधान, निवड तुमची आहे.

रूढ झालेल्या परंपरा छेद देताना, नवीन वाट तयार करताना सगळ्यांचे डोळे वाटरतात, कान टवकारतात, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे डोळे वटारणारे, कान टवकारणारे उद्या तुमचं पोट भरायला येणार नाहीत. तुम्ही नवीन मार्ग तयार केलात, नवीन वाट तयार केलीत तर हेच उद्या कौतुक करतात !

  • योगेश विद्यासागर.

कर्ज बुडवणाऱ्यांच्या विरोधात मोदी सरकार अॅक्शनमध्ये !

अखेर न्याय मिळाला, आसारामला जन्मठेप !

पूर्ण देशात २४ विद्यापीठं बनावट – युजीसी यादी जाहीर !

संजय लीला भन्साळींच्या नव्या चित्रपटात रणवीरऐवजी ह्रितिक रोशन !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment