Mumbai plane crash वैमानिक मारिया झुबेर यांच्या पतीचे गंभीर आरोप

काल मुंबईतल्या घाटकोपर परिसरात चार्टर्ड प्लेन कोसळल्यानंतर त्यावर शोधकार्य तर सुरु आहेच. पण महिला वैमानिक मारिया झुबेर यांच्या पतीने यू वाय अॅव्हिएशन या कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

मारिया झुबेर यांच्याकडे एक हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. यू वाय अॅव्हिएशन कंपनीने जबरदस्तीने विमानाची चाचणी घेतली. खराब हवामान असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. तरीही या विमानाची चाचणी घेण्यात आली. कंपनीच्या हट्टामुळेच मारिया झुबेर आणि इतरांचा घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्यू झाला असा आरोप मारिया झुबेर यांचे पती प्रभात कथुरिया यांनी केला. घाटकोपर विमान दुर्घटनेतील पायलट मारिया झुबेर यांच्यासह एकूण पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर मारिया झुबेर यांचे पती अॅडव्होकेट प्रभात कथुरिया यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. मारिया झुबेर आणि प्रदीप राजपूत यांनी खराब हवामान असल्याचे सांगितले होते मात्र कंपनीने आग्रह केला आणि त्याचमुळे या सगळ्यांचा मृत्यू झाला असा आरोप कथुरिया यांनी केला आहे.

युवाय कंपनीने आग्रह धरल्याने आज सकाळी ८ वाजताच त्यांनी घर सोडले होते. मी मारियाला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुठे आहेस? असा मेसेज पाठवला होता मात्र या मेसेजला कोणाताच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आणि त्यानंतर विमान अपघाताची बातमीच समोर आली असेही प्रभात यांनी म्हटले आहे.

या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून हे विमान यू वाय अॅव्हिएशन या कंपनीचे होते.  वैमानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला.

घटनास्थळाची पाहणी करुन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. दुर्देवात सुदैव एवढंच की बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी विमान पडल्याने आजुबाजूच्या इमारतींमधील रहिवासी सुखरुप आहेत. याप्रकरणी उड्डाण मंत्रालयाने चौकशीचा आदेश दिला आहे. मीदेखील त्यांना विनंती केली आहे. अशा प्रकारचा अपघात होणं खूपच धोकादायक आहे’.

‘योग्य चौकशी आणि कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास आहे. कारण चूक कोणाची आहे ते समोर येणं गरजेचं आहे. आता काहीही म्हणणं घाईचं ठरेल’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment