देशातील कोणत्याही धार्मिक स्थळी अस्वच्छता असल्यास करा तक्रार : सर्वोच्च न्यायालय

देशातील बहुतेक धार्मिक स्थळांवर भक्‍तांना अस्वच्छता, गैरसोय किंवा ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका बसत असल्याचे पाहायला मिळते. मात्र आता याची थेट सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. देशातील कोणत्याही धार्मिक स्थळी गैरसोय, अस्वच्छता किंवा ढिसाळ व्यवस्थापन असल्यास भाविकांना त्याची तक्रार करता येणार आहे. त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात दाद मागता येईल, असे न्यायालयाने नमूद केले.

काटेकोर नियोजन करा

मंदिर किंवा कोणतीही धार्मिक स्थळांवर योग्य व्यवस्थापन आणि काटेकोर नियोजन करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जर तसे न झाल्यास भाविकांना त्याबाबतची तक्रार करता येईल, असे न्यायानयाले नमूद केले. ओदिशातील जगन्नाथ मंदिराबाबतच्या एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना उद्देशून याबाबतचे आदेश दिले.

धार्मिक स्थळी व्यवस्थापनातील कमतरता, अस्वच्छता, तुमच्या ऐवज-मालमत्तेचे संरक्षण किंवा भाविकांनी अर्पण केलेल्या दानाचे योग्य वापर याबाबतच्या तक्रारी भाविक जिल्हा न्यायालयात करु शकतात. जिल्हा न्यायाधीश त्याबाबतचा आढावा घेऊन आपला अहवाल उच्च न्यायालयात सादर करतील.

यावेळी आसाममधील कामाख्यादेवी मंदिर, कोलकात्यातील कालीबरी मंदिर, दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिर, तामिळनाडूतील तिरुचेंदूर मंदिर आणि अजमेरमधील ख्वाजा मैनुद्दिन चिस्ती दर्गा यांचे दाखले देण्यात आले.

न्यायालयाने जून महिन्यात ओदिशातील जगन्नाथ मंदिरातील गैरसोयींवरुन ओदिशा सरकारला योग्य व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देशातील सर्वच धार्मिक स्थळांना लागू करत, धार्मिक स्थळांवर योग्य व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले.

यावेळी ओदिशा सरकारला जम्मू काश्‍मीरमधील वैष्णोदेवी, गुजरातमधील सोमनाथ मंदिर, पंजाबमधील सुवर्ण मंदिर, आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिर आणि कर्नाटकातील धर्मस्थळ या मंदिर प्रशासनाचा अभ्यास करुन, अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

या मंदिरांमध्ये भाविकांना कशा सुविधा दिल्या जातात, भाविकांची गैरसोय होणार नाही याची कशी दक्षता घेतली जाते, ते पाहून हा अहवाल देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने ओदिशा सरकारला दिल्या आहेत.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment