एक दिवस ‘टेक्नॉलॉजी’विना करून बघितलं तर ?

एक काळ असा होता की आपण सगळे म्हणायचो की, भविष्यात मोबाईल आणि कंप्युटर हे माणसाचा वेळ वाचवतील. आता हे विधान एकदम विनोदी वाटूच शकतं. पण त्यावेळेस आपण असा विचार सुद्धा नसेल केला.

काही बाबतीत जरी आपला वेळ या टेक्नॉलॉजीने वाचवला असला तरी तासंतास आपण त्या मोबाईलमध्ये असतोच. आज सोशल मिडीयावर घरातला प्रत्येकजण आहे. फेसबुक आणि Whatsapp हे तर आज प्रत्येकाचंच रोजच्या वापराचं झालं आहे.

एखाद्याच्या आयुष्यात काय घडतंय तो कुठे आहे यासाठी आपण त्यांना भेटायचो, बोलायचो कधी फोन करायचो. पण आता सगळं उलटं आहे. आज तुम्हाला तुमच्या ग्रुपमधला कोणी व्यक्ती कुठे आहे तो काय करतोय, त्यानी गेल्या काही वर्षात काय केलंय हे सगळं तुम्हाला सोशल मिडीयावर कळू शकतं. त्यासाठी तुम्हाला त्याला भेटायची किंवा बोलायची गरज नाही राहिली आता.

प्रत्येकजण जिथं जातोय तिथं फोटो क्लिक करून अपलोड करतोय, फेसबुकला स्टेटस अपडेट करतोय. कोणतं गाणं ऐकतोय, कोणतं आवडतंय हे सगळं तो इथं फेसबुकला टाकतोय. त्यामुळे तुम्हाला इथं त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय काय चाललाय हे निदान वरवर कळू शकतं.

Whatsapp

आणखी जर थोडं खोलात जायचं असेल तर मग तुम्हाला Whatsapp चा आधार घ्यावा लागेल. रोज बदलणारे डीपी, रोज बदलणारे स्टेटस सेकंदासेकंदाला नवीन अपडेट्स जर मिळवायच्या असतील तर Whatsapp हे तुमच्या मदतीला आहे !

काही काही जण तर Whatsapp च्या ग्रुपमध्ये एवढं काही फॉरवर्ड करत असतात की बास ! त्यांनी ते वाचलेलं असो किंवा नसो. यापैकी किती जणांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल ? महाभारत ? रामायण ? बर हे सोडा सगळं. अगदी सगळं सोडा ! निदान घरात येणारा पेपर ? अर्थात वर्तमानपत्र ! हा शब्द किती जणांना माहित असेल आज Whatsappच्या जमान्यात ?

घरी आले की…

सगळ्या घरात चित्र असतं, ऑफिसमधून घरी आले की सगळ्यांच्या हातात पहिले मोबाईल येतो आणि टाळकं त्यात घालून बसतात. चित्र असं असतं की चार भिंती, त्या चार भिंतीच्या आत बसलेले चार जण, जे छोट्याश्या मोबाईलमध्ये आनंद, सुख शोधतायत, त्यांना खूप उशिरा कळेल की तो आनंद, ते सुख त्यांच्या शेजारीच आहे. शेजारी बसलेले माणसं हे तुमचे घरचे आहेत ! त्यांच्याशी बोला, हे असं सांगायची का गरज यावी ?

माणूस लांब गेला की मग आपण म्हणणार काय किती दिवस झाले आलाच नाहीस / आलीच नाहीस. पण जर एखादा माणूस घरी येतोय पण तो आला तरी तुम्ही त्याच्याशी न बोलता मोबाईलमध्ये डोकं घालून बसणार असाल तर समोरच्यानी तरी का यावं सारखं ? आणि का ऐकावं तुमचं ?

आज कित्येकजण असे आहेत जे समोर बोलायला घाबरत आहेत. त्यांना सोशल मिडिया हे माध्यम बोलायला सोप्पं जातंय. खरंच सोप्पं जातंय ? हा प्रश्न खूप मोठा आहे. खरंतर ही सोशल मिडिया आपल्या सगळ्यांचं समोर बोलणं कमी करत करत बंद करणार आहे.

आज समोर जरी कोणी भेटत नसले तरी सगळे फेसबुकवर लाइव्ह जातात. तिथे आपण त्यांना भेटू शकतो. समोर जरी नसले कोणी तरी आपण व्हिडिओ कॉल करू शकतो. अर्थात या सगळ्यालाच ना नाहीये. किंवा हे वाईटच आहे असंही नाही. पण आपण संवाद हरवत चाललो आहे हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.

कोणती गोष्ट सोशल मिडियावर ठेवायची आणि कोणती पर्सनल हे आज ज्यानी त्यानी नीट ओळखणं खुप गरजेचं झालं आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. यंदाचा उन्हाळा होऊन जाऊदेत मग टेक्नॉलॉजीविना ! निदान प्रयत्न करून तर बघा. बघुयात काय होतंय !

  • योगेश विद्यासागर.

आणि शेवटी सलमान खान सुटला ! जामीन मंजूर !

आज आहे आरोग्य दिन ! जाणून घ्या काही खास टिप्स.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग – संपादित जमिनीसाठी ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई !

सलमान खानचं संकट अजून वाढलं ! न्यायाधीशांची झाली बदली !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment