सात वर्षांचा योग गुरु, दरमहा १०.९० लाख कमावतोय !

देशातील श्रीमंत व्यक्ती किती आणि कोण आहेत असं म्हटलं तर बरेच नावं डोळ्यासमोर येतील. पण समजा तुम्हाला सांगितलं की एक ७-८ वर्षांचा मुलगा आहे जो दरमहा १०.९० लाख कमावतोय, तर काय वाटेल बरं ? अर्थात चेष्टा वाटेल. गंमत वाटेल. पण हे खरं आहे !

नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस पार पडला. त्यानिमित्त पूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला गेला. सोशल मिडीयावर कित्येकजणांनी याबद्दल फोटो व्हिडिओ शेअर केले. आपण हे असे योगासनांचे कित्येक क्लासेस, वर्ग बघत असतो. तिथे कोणी शिक्षक असतात आणि ते सगळ्यांना शिकवत असतात. बरेच जण आवड म्हणून हे शिकवत असतात तर काहीजण पूर्णवेळ यातच असतात.

या शिक्षकांचं मानधन किंवा कमाई किती असेल बरं ? हजारात ? लाखात ? जेवढी असेल तेवढी असेल, पण एक ७ वर्षांचा मुलगा आहे जो योगासनं शिकवून महिन्याला १०.९० लाख कमावतोय ! आश्चर्य वाटलं ना ?

चीनमध्ये चक्क सात वर्षांचा मुलगा सर्वात लहान योग शिक्षक म्हणून प्रकाशझोतात आलाय. तो दरमहा 16,000 डॉलर म्हणजेच तब्बल 10.90 लाख रुपये कमवतोय. याच कारणास्तव चीनमध्ये तो त्याच्या वयातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

चीन नॅशनल मीडिया पीपल्स डेलीनुसार, हा मुलगा प्राचीन भारतीय योगामध्ये लोकांना प्रशिक्षण देतो. या मुलाचे नाव सुन चुयांग असं असून इंग्रजीत त्याचे नाव माईक आहे. सध्या तो चीनमध्ये खूप लोकप्रिय झालेला असून, सुन चुयांगला चिनी मीडियाने या महिन्याच्या सुरूवातीला प्रकाश झोतात आणलं होतं. चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतात राहणारा हा सुन केवळ एक चीनीच नाही, तर जगातील सर्वात तरुण प्रमाणित योग शिक्षक बनला आहे. दोन वर्षाचा असताना त्याने योगाभ्यास करण्यास सुरुवात केली.

सुनच्या आईनं चीनच्या राष्ट्रीय दैनिक चायना डेलीला बोलताना सांगितलं की,  तिचा मुलगा फक्त दोन वर्षांचा असताना पासूनच योग शिकायला लागला. तो दोन वर्षांचा असताना डे केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यात आलं तेव्हा मला तो ऑटिझमचा बळी पडलेला असल्याचं समजलं असं त्या म्हणाल्यात.

या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी, त्याच्या आईने त्याला योग सेंटरमध्ये नेलं. तो फक्त एका वर्षांच्या आतच अगदी उत्तम योगा करायला लागला. अन् तो योगात एक नैसर्गिक टॅलेंट म्हणून उदयास आला. नंतर दोन वर्षांतच त्याने ऑटिझमला मात केली.

सहा वर्षांच्या काळात, स्पेशल टॅलेंटमुळे तो हळूहळू प्रसिद्ध होत गेला. स्थानिक योग केंद्र त्याला त्याच्या केंद्रात नियुक्त करण्यासाठी धडपड करू लागले होते. सुनने आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं आहे.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment