संत समाधीचे मंदिर – भाग ७

लेखिका – डॉ. कल्याणी नामजोशी

( डॉ. कल्याणी नामजोशी यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेविषयी लिहिलेल्या विस्तृत लेखमालेचा भाग ६ आपण दिनांक १ जुलै २०१८ रोजी वाचला. आज सादर करत आहोत भाग ७ ).

माणसाचं रूप दोन अंगानं नटतं. एक त्याचं अंतरंग आणि त्याचं बहिरंग. वारकऱ्याच्या अंतरंगात विठ्ठलाची निष्कंप भक्ति आहे. तर बाहेर संप्रदायाचं प्रकट चिन्ह, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आणि बुक्का हे वारकऱ्याला भूषण आहे.

श्री ज्ञानेश्वरी, नाथभागवत, तुकोबाचा गाथा यांना संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानतात. त्याबरोबरच वेद, उपनिषद, गीता, भागवत, रामायण, महाभारत या ग्रंथांवर नितांत श्रद्धा आहे. श्रीपांडुरंगाची पूजा, ज्ञानदेवानाचा हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि तुकारामगाथा वाचन, तुळशीला नित्यनेमाने पाणी घालणे, सोमवार आणि एकादशीव्रत हे वारकऱ्यांचे नित्योपचार आहेत.

परोपकार, दया, सेवा आणि या सर्वांचा प्राण म्हणजे सदभाव ही वारकऱ्याच्या ठायी रुजलेली लक्षणं आहेत. वारकरी संप्रदायाची दीक्षा म्हणजे विठ्ठलाला प्रिय असलेली तुळशीची माळ गळ्यात घालायची याला वारकरी संप्रदायात माळ घेणे असे म्हणतात. ती माळ विठ्ठलनिष्ठेचे आणि त्यागी जीवनाचे द्योतक आहे. माळ धारण करणे म्हणजे एका दृष्टीने देहावर विठ्ठलाच्या नावाने ठेवलेलं तुळशीपत्रच होय. वारकऱ्यांचा माळ घेण्याचा विधी साधाच असतो. त्यात उपचाराचं अवडंबर नसतं. ज्याचे घराणे वारकऱ्यांचे आहे आणि जे वारकरीपरंपरा निष्ठेने सांभाळीत आले आहेत, अशा कोणत्याही फडाच्या प्रमुख व्यक्तीकडून नाहीतर वारकरी संप्रदायात आपल्या आचरण आणि विद्वत्तेने विशेष अधिकार प्राप्त झालेल्या वारकरी व्यक्तीकडून माळ घावी. दीक्षा देणारे वारकऱ्याच्या गळ्यात घालण्याची माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतात. नंतर ती माळ ‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर करून त्याच्या गळ्यात घालतात. माळ घेणाऱ्याला वारकरी पंथाच्या आचाराची, तत्वज्ञानाची आणि लौकिक व्यवहार कसा करावा याची शिकवण देतात. संप्रदायाच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन केले जावे यातच वारकऱ्यांचे कल्याण आहे अशी त्यांची प्रामाणिक श्रद्धा आहे.

खरं बोलावे, चारित्र्य संपन्न असावं, अपराध घडल्यास भगवंताकडे कळकळीनं क्षमायाचना करावी,शाकाहारी असावे, वर्षातून निदान एकदातरी पंढरीची वारी आणि आळंदीची वारी करावी. एकादशी व्रत, नित्य ‘रामकृष्ण हरि’चा जप, ज्ञानदेव हरिपाठ, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे नित्य वाचन आणि शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे प्रपंचात वाट्याला आलेली नित्य कर्मे विठ्ठलाचे समरण करीत प्रामाणिकपणे पार पाडावीत, असा उपदेश केला जातो. आणि माळ घेण्याचा विधी पूर्ण होतो.

वारीला जाणे हे वारकऱ्यांचे जीवाचे वेड आहे. पंढरीची वारी देवाची, तर आळंदीची वारी संतांची. वारकरी वारीला आला नाही तर तो दिवंगत झाला एवढंच कारण असेच समजावे, इतका वारकरी वारीच्या बाबतीत निष्ठावान असतो. पंढरपूरची महत्वाची वारी आषाढ शुद्ध एकादशी आणि आळंदीची कार्तिक वद्य एकादशी, निष्ठावान वारकरी दोन्हीकडे जाणारच. वारीचे अनेकानेक लाभ वारकरी प्रतिवर्षी अनुभवत असतो. त्याने निष्ठा बळकट होते. अंतरीचा प्रेमा वर्धिष्णू होतो. संत सज्जनांच्या गाठीभेटी होतात. प्रेममूर्ति विठ्ठलाची उराउरी भेट होते, चंद्रभागेचं स्नान घडते, कीर्तन, भजन, काला यांनी प्रेमानंदाचे पाझर फुटतात. वारकऱ्याच्या दृष्टीने वारीचा काळ हा अवर्णनीय असा सुखसोहळा आहे. त्यामुळे पंढरीची पायी वारी वारकऱ्यांचे जीवन सर्वस्व आहे. प्राणापेक्षाही प्रिय आहे.

लेखिका – डॉ. कल्याणी नामजोशी

(लेखिका या संतवाड्मयाच्या अभ्यासक असून त्यांनी अध्यात्मिक विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची या विषयावरील व्याख्यानेही अत्यंत लोकप्रिय आहेत).

संत समाधीचे मंदिर – भाग ६

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment